Blog details
निशब्द
शहरामधून जाणारा मुख्य रस्ता आणि त्यातील गर्दीचे नाव सांगायची गोष्ट नाही. शहर मोठं असलं तरी विकास तेवढा नव्हता शहराचा एकतर्फी रस्ता असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला अडचण खूप होत होती. त्यात रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ता अशी स्थिती होती. रस्ता कसा असला तरी आम्हा भारतीयांना भागवून घ्यायची सवय आहे तीच इथं पण होती..
शहर जेमतेम असल्यामुळे त्यातील गटाराचे पाणी एका पुलापाशी जाऊन साचत होते आणि त्याच पूलाखालून त्या शहराची रेल्वे जाते. आणि उड्डाण पुलावरून वाहने जातात.. त्यामध्ये साखर कारखान्याकडे जाणाऱ्या वाहण्याची तर वेगळीच पंचायत. दोन्ही ट्राल्या भरलेले ट्रॅक्टर जेव्हा पूल चढतं तर त्याचं पुढचं तोंड वर वर होत राहत असं वाटतं की की असंच मागे मागे उलटत जाईल पण ड्रायव्हरची कमाल असते तसं काही होत नाही.. पण बऱ्याच वेळा दुसऱ्या वाहनावाल्याची दमछाक होते.. कधी कधी तिथं भांडण होतात म्हणा आणि कधी कधी ते मारामारीवर उतरतात.. ते भयानक दृश्य असतं !.
आज सुद्धा त्याच पुलावरून मी जात होतो. परिस्थिती वेगळी नव्हती फक्त दुपारी ऊन पडलेलं होतं. सगळीकडे धुरळाच धुरळा झाला होता. मी आपल चष्मा घालून स्टाईल मध्ये जात होतो पण ते रोजच असतं म्हणा. जेव्हा मी पुलापासून जात होतो तिथं एक दृश्य पाहिलं. दोन स्त्रिया अंगावर मळकट कपडे असलेल्या, केस विस्कटलेले, चेहऱ्यावर रुक्ष भाव, बाजूला दोन गठुडे ठेवलेले होते, आणि दोघेही मिळून काहीतरी ओढत होत्या. त्यांच्या आसपासची जागा एकदम घाण होती. येणारे जाणारी लोक नाकाला दाबून जात होती. पण त्या स्त्रियांना त्या वासाचा, आसपासच्या घाणीचा काही फरक पडत नव्हता. त्यांच्या जरा जवळून जाऊ लागलो तर कळालं की त्या पूलावर रुतून बसलेले, गंजलेलं पत्थर ओढत होत्या. एकीच्या हातातून रक्त येत होता पण ती त्याला जुमानत नव्हती आपली पूर्ण शक्ती एकत्रित करून ओढत होती.. असं वाटत होतं की पूर्ण दुःख कवटाळून त्या दोघेही त्याला जेरीस आणत होत्या. येणारे जाणारी माणसं त्यांना पाहत होती पण कोणाच्याही चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता. एखादी व्यक्ती आपलं काम करते आहे असं त्यांना वाटत असावं.. इतकं सहज घडत होतं...
त्याचपूलावर त्या दोन स्त्रियांची मुलं छोटे छोटे गाठोडे घेऊन उभारली होती.. ताटकळली होती, येणाऱ्या जाणाऱ्या ऑटोमधील शाळकरी मुलाकडे बघत होती पण ऑटोमधील मुलं त्यांच्याकडे बघत सुद्धा नव्हती... असं वाटत होतं की तिथे काहीच घडत नाही पण काहीतरी घडत होत पण तेवढं जाणीवपूर्वक पाहिला वेळ कुणाला नव्हता !
विशेष म्हणजे त्या दोन स्त्रियांना त्यांच्या लेकरांना आपण जे करतोय त्याच्यापेक्षा माणूस म्हणून चांगले, इतरसारखे जीवन जगण्याचा हक्क, अधिकार वगैरे आहे हे त्यांना माहीतच नसाव. असणार तरी कसे ? त्यांना सांगणार कोण ? सांगितले तरी त्यांचे परिस्थिती सुधारणार कशी ? कोण मदत करील ? त्यातल्या त्यात त्यांची येणारी पिढी सुद्धा शाळेत जाण्यापेक्षा त्याच रस्त्यावर दारिद्र्याचा गाठोड घेऊन उभी होती. आज मला दया, सहानभूती, करूणा हे शब्द फक्त शब्दच आहेत असं वाटत होतं... जसा त्या बिघडलेल्या, खड्डेच खड्डे पडलेल्या रस्त्याचा कोणी वाली नव्हता तसंच पोटासाठी भटकणाऱ्या, दारिद्र्याची कायम साडेसाती लागलेल्या त्या स्त्रियांचा त्या लेकरांचा कोणी वालीच नव्हता...... असतो कोण ? नसतोच कधी !. कुणीही यावं, फक्त बघावं, मनातल्या मनात काहीतरी पुटपूटावं आणि निघून जाव... पण विचार करणाऱ्यांना असे दृश्य गरिबी काय असते ? दारिद्र्य काय आहे ? मानवता काय आहे ? माणूस कोण आहे? यावर पूर्णविराम देतात.. कारण इथे शब्दाचा विचाराचं काहीच काम नसतं. पण शेवटी त्यांच्या मनामध्येही एक विचार येतोच याला आपण तरी काय करू शकतो !. पण खरंच का ! आपण काहीच करू शकत नाही !
अमोल..

Online Store
